राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अद्याप उभे राहिलेले नाही.
मुंबई- राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अद्याप उभे राहिलेले नाही. अखेर शिवसेनेवर जोरदार टीका झाल्यानंतर सोमवारी दादर येथील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहात मंजुर करण्यात आला. तसेच येथील महापौर निवासस्थान भायखळा राणी बागेतील अतिरिक्त आयुक्ताच्या बंगल्यात हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचा मार्ग अद्याप मोकळा होत नव्हता. त्यामुळे शिवसेनेला टीकेचे लक्ष्य व्हावे लागत होते. अखेर सोमवारी कोणत्याही चर्चेविना महापौर बंगल्याची जागा देण्याच्या प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात मंजूर करण्यात आला.
यापूर्वी सुधार समितीने आचारसंहितेचा आधी मंजूरी दिली होती. एक रूपया नाममात्र दराने ३० वर्षासाठी जमीन स्मारकासाठी ट्रस्टला देण्यात येणार आहे. ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासामार्फत’स्मारकाची उभारणी केली जाणार आहे.
दरम्यान,बाळासाहेबांच्या स्मारकाच्या आडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महापौर बंगल्यावर डोळा आहे, असा आरोप मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. समुद्रकिनारी वसलेल्या महापौर बंगला स्मारकाच्या नावाखाली उद्धव ठाकरेंना हडपायचा आहे, असा स्पष्ट आरोपही राज यांनी केला होता.
ज्या राणी बागेत एकही प्राणी नाही. तेथे लोक महापौरांना बघायला येणार, अशी टीकाही त्यांनी केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत या मुद्यावरुन जोरदार राजकारण तापले होते. महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वापरण्यास मनसेचा विरोध आहे.