महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षापासून वारंवार घडत आहेत
भिवंडी- कुटुंबीयांसह रिक्षाने काल्हेर येथे माहेरी गणपती दर्शनासाठी जात असताना मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास रेल्वेब्रिजच्या पुढे पाठीमागून भरधाव वेगातील दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने महिलेच्या गळ्याला हिसका मारून २ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे साडेसहा तोळ्याचे गंठण व तीन तोळ्यांचे पेंडल असे साडेनऊ तोळ्यांचे गंठण धूमस्टाईलने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जयमाला नरेश चौधरी (३२ रा. ठाकुर्ली, डोंबिवली) असे सोन्याचे गंठण लुटून नेलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला सासू सुशिला चौधरी, आजेसासू निराबाई आणि मुलगी रिद्धी यांच्या सोबतीने दिराचे मित्र मनोहर अनंत वाघेरे याच्या रिक्षातून काल्हेर येथे माहेरी गणपती दर्शनासाठी चालल्या होत्या.
त्यावेळी मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास रेल्वे ब्रिजच्या पुढे चढणीवर रिक्षा असताना टेहळणीवर असलेल्या लाल पांढ-या दुचाकीवरील चोरटय़ाने पाठीमागून येऊन जयमाला यांच्या गळ्यावर हिसका मारून २ लाख ३७ हजार ५०० रुपये किंमतीचे साडेसहा तोळ्याचे गंठण व तीन तोळ्यांचे पेंडल असे साडेनऊ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून ठाण्याच्या दिशेने पलायन केले. या गंठण चोरीच्या गुन्ह्याची नोंद कोनगांव पोलीस ठाण्यात केली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळासफाटा येथे रिक्षात अथवा दुचाकीवरून प्रवास करणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षापासून वारंवार घडत असूनही कोनगांव पोलिसांना दागिने चोरांना पकडण्यात अद्यापी यश आले नसल्याने महिला व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
[EPSB]
[/EPSB]