मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी मालाड पश्चिम येथील म्हाडाच्या मैदानावर होणार आहे.
मुंबई- मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी मालाड पश्चिम येथील म्हाडाच्या मैदानावर होणार आहे. याच वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘आपला संकल्प’ या जाहीरनाम्याचे प्रकाशनही केले जाणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई काँग्रेसने जय्यत तयारी केली असून मुंबईकरांसाठी आकर्षक जाहीरनामा तयार केला. ‘आपला संकल्प’ नावाने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी काय काय सुविधा दिल्या जाणार आहेत, याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
स्वच्छ व सुंदर मुंबई, मोफत स्वच्छ आणि मुबलक पाणी, चांगले रस्ते, खड्डेमुक्त रस्ते, कचरामुक्त मुंबई अशा अनेक योजना काँग्रेस घेऊन लोकांसमोर जाणार आहे. मुंबईत बदल आणि मुंबईचा सर्वागीण विकास हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत, अशी माहितीही निरुपम यांनी दिली.
मालाड पश्चिम येथे प्रचार शुभारंभाच्या होणाऱ्या जाहीर सभेला काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम तसेच काँग्रेसचे आजी व माजी खासदार, आमदार मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व उमेदवार, जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.