दादर येथील आंबेडकर भवन पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली.
मुंबई- दादर येथील आंबेडकर भवन पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. रत्नाकर गायकवाडला अटक झालीच पाहिजे, आंबेडकर भवन पाडणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी करत आंबेडकरी जनतेने भाजपा सरकारचा निषेध नोंदवला.
पावसाची तमा न बाळगता शेकडोंच्या संख्येने निळे तुफान घेऊन पुढे निघालेल्या मोर्चामुळे दादर, नायगाव परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संतप्त जमावाकडून झालेल्या किरकोळ दगडफेकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भरपावसात काढलेल्या या मोच्र्यात मुंबईसह राज्यभरातून आलेले आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भोईवाडा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढल्यानंतरही स्थानिक पोलिसांकडून पीपल्स इम्प्रुव्हमेंटच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. यावेळी संतप्त भिमसैनिकांनी वरिष्ठ अधिका-यांना पाचारण करण्यास भाग पाडले, त्यानंतर ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गायकवाड म्हणतात, बाबासाहेबांनी हे भवन बांधले नाही
आंबेडकर भवन पाडण्यात म्होरके व राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांवर बेछुट आरोप केले. यावेळी आजूबाजूला पोलीस व बाऊन्सरची सुरक्षा गायकवाड यांनी घेतली होती.
आंबेडकर भवन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधले नसल्याचा दावाही त्यांनी केला. आंबेडकर चळवळीचे मध्यवर्ती कार्यालय उभे करण्यासाठी बाबासाहेबांनी १९४४ मध्ये हा प्लॉट खरेदी केला. ज्याची मालकी पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टकडे बाबासाहेबांनी दिली.
१९७५ मध्ये या प्लॉटवर थोडेफार बांधकाम करण्यात आले. मंगल कार्यालयापुरते ट्रस्टचे काम सीमित होऊ शकत नाही. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस पाडली ही ओरड चुकीची असून ती जागा प्रेसची नव्हतीच, असा दावाही गायकवाड यांनी केला.