ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या व शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या जव्हार शहर व जव्हार परिसराचा पर्यटनासह सर्वागीण विकास करून जव्हार नगरपालिका आदर्श नगरपालिका करणार असल्याची ग्वाही आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिली.
वाडा – ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या व शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या जव्हार शहर व जव्हार परिसराचा पर्यटनासह सर्वागीण विकास करून जव्हार नगरपालिका आदर्श नगरपालिका करणार असल्याची ग्वाही आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिली. जव्हार नगरपरिषद जव्हारच्या शताब्दी महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार चिंतामण वणगा, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष संदीप वैद्य, विविध पक्षाचे माजी नगराध्यक्ष, आजी-माजी सर्वपक्षीय नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सवरा म्हणाले की, जव्हारच्या विकासाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. ती मी यशस्वीरीत्या पार पाडेन. जव्हार नगरपालिकेला ऐतिहासिक महत्त्व आहे. जव्हार शहराला सर्व पायाभूत सुविधा देऊन जव्हार नगरपालिकेला आदर्श नगरपालिका बनविणार आहे.
जव्हार परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास प्राधान्याने करणार आहे. आदिवासी संस्कृतीची जोपासना करून आदिवासी तरुणांना जव्हारमध्येच रोजगार उपलब्ध करून देणार आहे. मनोर येथे आदिवासी हाट उभारणार आहे. त्याच धर्तीवर जव्हारमध्येही आदिवासी हाट उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सवरा यांनी सांगितले. जव्हारमधून दोन राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. त्यासाठी पाचशे व चारशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे जव्हारचे महत्त्व वाढले आहे. याचा शहर व परिसराचा विकास होण्यासाठी उपयोग होणार आहे. जव्हार शहरातील अंतर्गत रस्त्यासाठीही निधी मंजूर केला असल्याचे सवरा यांनी यावेळी सांगितले.
[EPSB]
भावी अभियंते करणार वाहतूक नियमन
[/EPSB]