कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण परिसरात चैन स्नेचर्सनी धुमाकूळ घातला आहे.
कल्याण- कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या ग्रामीण परिसरात चैन स्नेचर्सनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात कल्याण डोंबिवली मधील विविध पोलीस स्थानकात पाच चैन स्नॅचिंगच्या घटनाची नोंद झाली असून पाच घटनांमध्ये तब्बल ७ लाख ७४ हजारांचे दागिने लंपास करत जणू पोलीस यंत्रणेला आवाहन दिले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील मुखर्जी रोड ओम लक्ष्मी नारायण इमारतीमध्ये राहणारी महिला शुक्रवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलींना क्लासमध्ये सोडून सावरकर रोडने परत येत असताना एमएसइबी ट्रान्सफर्मरजवळ पोहोचताच एक अनोळखी दुचाकीस्वार तरुण त्या ठिकाणी आला. त्याने या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन खेचून क्षणार्धात धूम ठोकली. या प्रकरणी सदर महिलेने डोंबिवली पोलीस स्थानाकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सूरू केला आहे.
तर दुसरी घटना कल्याण पश्चिम येथे घडली आहे. कल्याण पश्चिम गौरी पाडा रोड किंगस्टन योगिधाममध्ये राहणारी महिला शुक्रवारी संध्याकाळी सिंडिकेट परिसरातील बँकेतून दागिने काढून घराकडे परतण्यासाठी रिक्षाची वाट बघत असताना दोन अज्ञात इसम दुचाकीवरुन आले. त्याने या महिलेच्या हातातील ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी खेचून क्षणार्धात धूम ठोकली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार तरुणा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
तिसरी घटना डोंबिवली पूर्वेकडील शांती नगर शाळेच्या चौकात घडली. डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी विठ्ठल पाटील इमारतीमध्ये राहणारी महिला
शुक्रवारी सायंकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भंडा-याचा कार्यक्रम आटोपुन घराकडे परतत असताना शांतीनगर शाळेच्या चौकात पोहचताच दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले. त्यांनी या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने प्रतिकार करत चैन पकडली. दरम्यान, या चोरटय़ांनी तिला हिसका देत चैन खेचून पसार झाले. या प्रकरणी या महिलेने टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. चौथी घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. अंबरनाथ परिसरात राहणारा ५७ वर्षीय इसम शुक्रवारी सायंकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व स्टेशनच्या दिशेने पायी चालत येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या एक दुचाकीस्वराने १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन खेचून पळ काढला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
पाचवी घटना कल्याण पश्चिमकेडील खडकपाडा परिसरात घडली आहे. या परिसरात राहाणारी महिला शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजन्याच्या सुमारास आपल्या कुटुंबासह आपल्या मुलीला कानातील रिंग घेऊन घराकडे परतत असताना पाठीमागून दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले. त्यांनी या महिलेच्या गळ्यावर थाप मारून २ लाख ५९ हजार रुपये किमतीचे दोन मंगळसूत्र खेचून क्षणार्धात धूम ठोकली. या प्रकरणी सदर महिलेने खडकपाडा पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
[EPSB]
[/EPSB]