हास्य कलाकार कपिल शर्माने महापालिका अधिका-यांसह राजकीय पक्षांवर ट्विटरवरून लाचखोरीचा आरोप करताच त्याचीच कुंडली बाहेर आली आहे. तसेच या आरोपांमुळे राजकीय वातावरणही तापले आहे.
मुंबई- कपिल शर्माने महापालिका अधिका-यांसह राजकीय पक्षांवर लाचखोरीचा आरोप करताच त्याचीच कुंडली बाहेर आली आहे. त्याचे गोरेगाव निवासस्थानी असलेले डीएलएच इन्क्लेव्हमधील नवव्या मजल्यावरील बांधकाम अनधिकृत आहे. या डीएलएच इन्क्लेव्हमध्ये कपिलसह अभिनेता इरफान खान व इतर पाच जणांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेने स्वतंत्र नोटीस बजावली आहे. तसेच विकासकानेही अनधिकृत बांधकाम करून वाहनतळ, पोडियम, फ्लॉवर बेड आदींमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सर्वावरच महापालिका कारवाई करणार आहे. गणेशोत्सवानंतर महापालिका एमआरटीपीअंतर्गत तोडकामाची कारवाई हाती घेणार आहे.
कपिलने वर्सोव्यातच अनधिकृत बांधकाम केले नसून गोरेगाव प. न्यू लिंक रोडवरील ग्रीन पार्कजवळील देव लँड अँड हौसिंग प्रायव्हेट लिमिटेड (डीएलएच) यांनी बांधलेल्या अकरा मजली इमारतीत नववा मजल्या असलेल्या सदनिकेतही अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर येत आहे.
कपिलने आपल्या घरातील बांधकामातही मोठे बदल केले आहेत. याप्रकरणी त्यांना २८ एप्रिल २०१६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. बॉलिवूड अभिनेता इरफान खान (पाचवा मजला), नारंग (चौथा मजला), श्रीमती सारा मयने (बारावा मजला)आणि अन्य एक (सोळावा मजला)अशाप्रकारे पाच सदनिकाधारकांना पालिकेने एमआरटीपीअंतर्गत नोटीस बजावली होती. त्यांनी अंतर्गत रचना बदलून घराचे नूतनीकरण केले. इमारतीच्या मंजूर आराखडय़ात बदल करून बांधकाम केले. यात वाहनतळ व पोडियमच्या जागेचा गैरवापर झाला आहे. अग्निसुरक्षेसाठी मोकळी जागा ठेवणे बंधनकारक असताना तेथे अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे विकासकालाही महापालिकेने एमआरटीपीअंतर्गत नोटीस बजावली आहे.
अनधिकृत बांधकामांवर हातोडा हवाच
नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर कपिलसह पाच जणांना व विकासकांना एमआरटीपीअंतर्गत नोटीस बजावण्यात आली. मात्र पोलीस संरक्षण मिळत नाही, म्हणून त्यांच्याविरोधात कारवाई टळली आहे. याप्रकरणी राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतरही कारवाई केली जात नव्हती. या इमारतीचे बांधकामच अनधिकृत असल्याने त्यावर हातोडा चालवावा, अशी मागणी माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.
पर्यावरण विभागाची परवानगी नसतानाही..
या इमारतीशेजारी ओशिवरा नदी वाहते. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी बंधनकारक आहे. मात्र ती नसतानाही या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यात आले. ते देताना या इमारतीत नियमबाह्य काम झाले होते. त्यामुळे ही ओसी कशी दिली, असा सवाल दिलीप शिंदे यांनी केला आहे.
कपिल शर्माविरोधात राजकीय वातावरण तापले
हास्य कलाकार कपिल शर्माने पालिका अधिकारी व राजकीय पक्षांविरोधात ट्विटरवरून केलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे, भाजपाने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून व निदर्शने करत अटकेची मागणी केली. सपानेही कपिलला कायदेशीर नोटीस पाठवून तीन दिवसांत सत्य उजेडात आणा नाहीतर मानहानीच्या दाव्याला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसनेही राज्यपालांना पत्रव्यवहार करून या भ्रष्टाचाराची दखल घेण्याची विनंती केली आहे.
कपिल शर्माच्या वर्सोवा अंधेरी पश्चिम व गोरेगाव पश्चिमेतील अनधिकृत बांधकामांची प्रकरणे समोर आली आहेत. कपिल शर्मा यांनी पालिका अधिका-यांवर लाचखोरीचा आरोप केला आहे. कपिल यांनी नियमबाह्यपद्धतीने बांधकाम करायचे व बांधकाम हटवण्याची नोटीस मिळाल्यानंतर अधिकारी पैसे मागतात, असे बिनबुडाचे आरोप करायचे हे योग्य नसून अनधिकृत बांधकाम व विनापरवानगी तिवरांची कत्तल केल्याप्रकरणी शर्माविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून दोन्ही ठिकाणच्या बांधकामांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सपाचे पालिका गटनेते रईस शेख यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सपाचे रईस शेख यांनीही गोयंका लॉ असोसिएट्सतर्फे कपिल यांना कायदेशीर नोटीस पाठवून तीन दिवसांत लाचखोरीबाबतची सत्य माहिती उपलब्ध करून द्यावी अन्यथा आपल्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वर्सोव्यात कपिलकडून अतिक्रमण
कपिलने बंगल्याच्या बांधकामात खाडी परिसरात भराव टाकून बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. शुक्रवारी वनखाते व पर्यावरण विभागाच्या अधिका-यांनी या जागेची पाहणी केली. वनखात्याचे अधिकारी मकरंद घोडके यांनी दुपारी ३ ते ४ दरम्यान येथील ३०० ते ४०० चौरस मीटर परिक्षेत्राची पाहणी केली. यात कपिलने खाडीच्या संरक्षित किनारपट्टीवर (बफरझोन) भराव टाकून बांधकाम केल्याचे दिसून आले. मात्र वनखात्याच्या जमिनीवर हे बांधकाम झाले नसल्याचे दिसून आले. येथील ५० बंगल्यांत अनधिकृत बांधकाम असल्याचेही दिसून आले. कपिलने खाडी परिसरात भराव टाकून बांधकाम केल्याने वॉचडॉग संस्थेने वन व पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.
मनसेची निदर्शने
कपिल शर्माविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी व एफआयआर दाखल करण्याची मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे व पालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांची भेट घेतली. यावेळी वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी कपिलच्या अटकेसाठी निदर्शने केली. कपिलकडे अधिका-यांनी लाच मागितल्याचा आरोप केला आहे मग तो त्या अधिका-यांचे नाव का उघड करत नाही, असा सवाल मनसेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कपिलविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला.
भाजपाचेही आंदोलन
कपिल यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांची खरी माहिती समोर आणावी अन्यथा आपण त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा देणारे भाजपाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी गोरेगाव येथे कपिलच्या घरासमोर निदर्शने केली व त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.