कोकण शिक्षक मतदारसंघात येत्या ३ फेब्रुवारी रोजी मतदार होणार असल्याने या निवडणुकीसाठी विविध पक्ष संघटनांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
मुंबई- कोकण शिक्षक मतदारसंघात येत्या ३ फेब्रुवारी रोजी मतदार होणार असल्याने या निवडणुकीसाठी विविध पक्ष संघटनांकडून जोरदार तयारी सुरू आहे. हा शिक्षक मतदारसंघ असला तरी यंदाच्या निवडणुकीत विविध पक्षांकडून उभे राहणा-या उमेदवारांत संस्थाचालक उमेदवारांचाच अधिक भरणा असल्याचे चित्र आहे. यामुळे या निवडणुकीत पैसेवाल्या संस्थाचालकांकडून मोठया प्रमाणात लक्ष्मीदर्शन करण्याची तयारीही जोरात सुरू असल्याने ही निवडणूक संस्थाचालक विरुद्ध शिक्षक उमेदवार अशी रंगणार आहे.
कोकणातील ठाणे, रागयड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ३६ हजारहून अधिक मतदार असून; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १६ हजारांच्या दरम्यान मतदार आहेत. या मतदारसंघात ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार रामनाथ मोते असून; ते यंदा शिक्षक परिषदेऐवजी अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
तर त्यांच्याविरोधात परिषदेने मतदार संघ आणि शिक्षकांतही फारशी ओळख नसलेला उमेदवार दिला आहे. तर शिक्षक म्हणून ओळख असलेल रामनाथ मोते यांनी मागील चार दशकापासून शिक्षकांसाठी झोकून दिले असून विधानपरिषदेत मागील दोन वेळा निवडून आल्यानंतर शिक्षकांच्या असंख्य प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. याचा फारशी ओळख नसलेल्या शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच शिक्षक भारतीने आपला उमेदवार उभा केला असून शेकाप आदी पुरस्कृत पक्षांकडून व त्यांच्या पाठिंब्यावर अनेक उमेदवार उभे राहत आहेत.
कोकणातील शिक्षक मतदारसंघात संस्थाचालकाकडून शिक्षकांचे शोषण होत आहे. दुसरीकडे ठाण्यासह रायगड आदी ठिकाणी अनेक मराठी शाळा संस्थाचालक बंद करून त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करत आहेत. या वेळी मैदानात उतरत असलेले सर्वाधिक उमेदवार हे संस्थाचालक असल्याने शिक्षक मतदारांची नाराजी या वेळी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यात रायगड जिल्ह्यातून शेकाप, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बाळाराम पाटील निवडणुकीच्या मैदानात उभे असून ते शिक्षक नसले तरी अनेक संस्थांचे संस्थाचालक म्हणून परिचित आहेत. तर ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाचे संस्थाचालक केदार जोशी हे या वेळीही आपले नशीब आजमावण्याच्या तयारीला लागले आहेत. तर ऐनवेळी शिवसेनेचा पाठिंबा मिळेल, या आशेवर असलेले बदलापूर-अंबरनाथ येथील शिवभक्त विद्यालयाचे व विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा चालवणारे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे हेही मैदानात उतरले आहेत.
प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकारही नसताना रायगडमधील शिक्षक नरसू पाटील हेही या मैदानात उतरले आहेत. इतर संस्थाचालक उमेदवारांप्रमाणेच पाटील यांच्यामागे परिसरातील मोठी आर्थिक लॉबी असल्याचे बोलले जाते. तर येत्या चार दिवसांत इतर पक्षांकडून शिक्षक आणि इतर क्षेत्रातील उमेदवारही मैदानात उतरणार असून अनेकांची नावे लवकरच स्पष्ट होणार आहेत.