सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलाने वाहतुकीचा बराचसा ताण हलका झाला असला तरी कुर्ला पूर्व नेहरूनगर मार्गावर सकाळ-संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी वाहनधारक, बस आणि रिक्षा प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे.
मुंबई- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलाने वाहतुकीचा बराचसा ताण हलका झाला असला तरी कुर्ला पूर्व नेहरूनगर मार्गावर सकाळ-संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी वाहनधारक, बस आणि रिक्षा प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. या मार्गावर होणा-या वाहतूक कोंडीला रस्त्यावर ‘वाटमारी’ करून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे आणखीन हातभार लागत असून या मार्गावरून वाहतूक पुढे सरकण्यासाठी बराच काळ रखडपट्टी
होत आहे.
कुर्ला पूर्व नेहरूनगर मार्गावर रस्त्यावर कशाही पद्धतीने पथारी पसरून बसणा-या फेरीवाल्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याच्या थाटात ते वावरत आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून होणा-या थातूरमातूर कारवाईवर या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व कुर्लावासीय समाधान मानत असले तरी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.
लोकप्रतिनिधींना नाही देणे-घेणे
कुर्ला नेहरूनगर परिसरात बॅनरबाजीतून झळकणा-या स्थानिक लोकप्रतिनिधींना या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि स्थानिकांना चालण्यासाठीही ‘वाट’ मिळत नसल्याचे कोणतेच सोयरसुतक नाही. प्रत्येक दिवस बॅनरबाजीतून साजरा करणारे लोकप्रतिनिधी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तरी या गोष्टींकडे लक्ष पुरवतील का? असा सवाल प्रवासी व स्थानिकांतून उपस्थित होत आहे.