दुबळ्या अफगाणिस्तानचा सहजरित्या पराभव करत न्यूझीलंडने विश्वचषकातील सलग पाचव्या विजयाची नोंद केली.
नेपियर– यजमान न्यूझीलंडचे काही खरे नाही. विश्वचषक स्पर्धेच्या गटवार साखळीत (अ गट) सोमवारी कमकुवत अफगाणिस्तानवर सहा विकेटनी मात करत किवींना सलग पाचवा विजय नोंदवला. यंदाच्या विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ आहे.
अफगाणिस्तानचे १८७ धावांचे आव्हान गाठताना न्यूझीलंडने १३.५ षटके राखून विजय मिळवला. त्यात सलामीवीर मार्टिन गप्टिलचे सर्वाधिक ५७ धावांचे मोठे योगदान राहिले. मात्र त्यांचा आणखी एक सोप्पा विजय पूर्वार्धातच नक्की झाला होता. अनुभवी डावखुरा फिरकीपटू डॅनियल व्हेटोरीच्या (१०-४-१८-४) प्रभावी मा-यासमोर अफगाणिस्तानला डावाची संपूर्ण षटकेही खेळून काढता आली नाहीत. वनडे कारकीर्दीत तीनशे विकेटचा टप्पा गाठणा-या व्हेटोरीलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
मार्टिन गप्टिलने एक बाजू लावून धरताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार ब्रेंडन मॅककलमसह (४२) त्याने झटपट अर्धशतकी सलामी देताना ५.५ षटकांत ५३ धावा जोडल्या. त्यानंतर केन विल्यमसनसह (३३) दुस-या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करताना संघाला एक सफाईदार विजय मिळवून दिला. ३६.१ षटकांत न्यूझीलंडने प्रतिस्पध्र्याचे आव्हान पार केले. मॅककलमने केवळ १९ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावा फटकावल्या. गप्टिलने सात चौकार लगावले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय अफगाणिस्तानसाठी चुकीचा ठरला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसह (३४-३) ऑफस्पिनर व्हेटोरीच्या अचूक गोलंदाजीमुळे एका क्षणी त्यांची अवस्था ६ बाद ५९ धावा अशी झाली. मात्र नजिबुल्ला झाडरन (५६) आणि समिउल्ला शेनवरीने (५४) खेळपट्टीवर ठाण मांडले. या जोडीने सातव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करताना अफगाणिस्तानला दोनशेच्या घरात पोहोचता आले. नजिबुल्लाचे हे दुसरे वनडे अर्धशतक आहे. शेनवरीने मात्र त्याच्या अर्धशतकांची संख्या १०वर नेली.
तीनशे विकेट घेणारा व्हेटोरी न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज
अफगाणिस्तानविरुद्ध चार विकेट घेत डॅनियल व्हेटोरीने वनडेतील बळींचे त्रिशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील १२वा आणि न्यूझीलंडलचा पहिला गोलंदाज आहे. नवरोझ मंगल त्याचा ३००वा बळी ठरला. व्हेटोरीने २९१ लढतीत तीनशेचा आकडा पार केला. या लढतीनंतर त्याच्या नावावर ३०२ विकेट झाल्यात. त्याची सरासरी ३१.६२ इतकी आहे. एका लढतीत चारहून अधिक विकेट घेण्याची व्हेटोरीची आठवी वेळ आहे. वनडेत सर्वाधिक विकेट श्रीलंकेचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनच्या (५३४) नावावर आहेत. पाचशेहून अधिक विकेट घेण्याची करामत त्याच्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक वासिम अक्रमच्या (५०२) नावावर आहे. ३६ वर्षीय व्हेटोरीने कसोटीत ३६२ विकेट घेतल्यात.
अफगाणिस्तान : जावेद अहमदी पायचीत गो. बोल्ट १, उस्मान घानी त्रिफळा गो. व्हेटोरी ०, नवरोज मंगल त्रिफळा गो. व्हेटोरी २७, असघर स्टॅनिकझाई झे. गप्टिल गो. बोल्ट ९, समिउल्ला शेनवारी झे. टेलर गो. अॅँडरसन ५४, मोहम्मद नाबी झे. टेलर गो. व्हेटोरी ६, अफसर झाझाई पायचीत गो. व्हेटोरी ०, नजिबुल्ला झाद्रन झे. व्हेटोरी गो. मिल्ने ५६, दौलत झाद्रन झे. रॉँकी गो. बोल्ट १, हमीद हसन झे. मिल्ने गो. अॅँडरसन १६, शपूर झाद्रन नाबाद २, अवांतर – १४ धावा (लेगबाईज ५, वाईड ९), एकूण – ४७.४ षटकांत सर्वबाद १८६
बादक्रम : १-५ (अहमदी), २-६ (घानी), ३-२४ (स्टॅनिकझाई), ४-४९ (मंगल), ५-५९ (नाबी), ६-५९ (झाझाई), ७-१४५ (नजिबुल्ला झाद्रन), ८-१५१ (दौलत झाद्रन), ९-१६६ (शेनवारी), १०-१८६ (हमीद हसन)
गोलंदाजी : टिम साउदी १०-०-४३-०, ट्रेंट बोल्ट १०-२-३४-३, डॅनियल व्हेटोरी १०-४-१८-४, अॅडम मिल्ने १०-०-३८-१, कोरी अॅँडरसन ६.४-०-३८-२, ग्रॅँट इलियट १-०-१०-०
न्यूझीलंड : मार्टिन गप्टिल धावचीत (मंगल/शेनवारी) ५७, ब्रेंडन मॅककलम त्रिफळा गो. नाबी ४२, केन विल्यमसन झे. शेनवारी गो. शपूर झाद्रन ३३, रॉस टेलर नाबाद २४, ग्रॅँट इलियट धावचीत (नाबी) १९, कोरी अॅँडरसन नाबाद ७, अवांतर – ६ धावा (लेगबाईज २, वाईड ४), एकूण – ३६.१ षटकांत ४ बाद १८८
बादक्रम : १-५३ (मॅककलम), २-१११ (विल्यमसन), ३-१४३ (गप्टिल), ४-१७५ (इलियट)
गोलंदाजी : दौलत झाद्रन ९-०-५१-०, शपूर झाद्रन १०-२-४५-१, हमीद हसन ७-१-३६-०, मोहम्मद नाबी ७.१-०-३९-१, समिउल्ला शेनवारी ३-०-१५-०
निकाल : न्यूझीलंड ६ विकेटनी विजयी.
सामनावीर : डॅनियल व्हेटोरी.