गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणि हवाई वैद्यकीय अॅम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.
मुंबई- गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणि हवाई वैद्यकीय अॅम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. यापूर्वी या भागासाठी सरकारकडून भाड्याने हेलिकॉप्टर वापरण्यात येत असल्याने त्याचा मोठा वित्तीय भार सहन करावा लागत होता. यासोबतच शासनाच्या वापरासाठीही दुसरे नवीन हेलिकॉप्टर घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने एप्रिल २००१ मध्ये डॉफिन एएस ३६५ एन ३ व्हीटी-एमजीके हे हेलिकॉप्टर फ्रान्समधील युरोकॉप्टर कंपनीकडून २३ कोटी रुपयांना खरेदी केले होते.
६ + २ अशी आसनक्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरचा वापर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींनी दहा र्वष केला. युरोकॉप्टर उत्पादक कंपनीच्या सेवा नियमावलीनुसार प्रत्येक हेलिकॉप्टरने पाच हजार उड्डाण तास अथवा दहा वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याची पूर्णत: तपासणी करावी लागते. २०१० नंतर केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण संचालनालयाने देशातील सर्व राज्यांमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरात येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या हेलिकॉप्टरने २२०१ उड्डाण तास पूर्ण केल्यानंतर ते पाच वर्षे एकाच जाग्यावर आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने जानेवारी २०१६ मध्ये या हेलिकॉप्टरची देखभाल-दुरूस्ती करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्या दुरुस्तीचा खर्च खूप मोठा आहे. तसेच त्याची विक्री करूनही फार मोठी किंमत येणार नसल्याने ते राज्यातील शैक्षणिक संस्थेला अभ्यास वा त्या स्वरुपाच्या प्रयोजनासाठी विनामुल्य देण्यात येणार आहे.
या प्रस्तावासोबतच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासह हवाई वैद्यकीय अॅम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवीन हेलिकॉप्टर घेण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या या प्रयोजनासाठी भाडय़ाने हेलिकॉप्टर वापरण्यात येते. त्याचा शासकीय तिजोरीवर पडणारा भार लक्षात घेता नवीन हेलिकॉप्टरची खरेदी फायदेशीर ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
[EPSB]
‘आमच्या देशातून दहशतवादी संघटना सक्रीय होतात’
[/EPSB]