भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडून हवाई हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘ड्रोन’, मायक्रोलाईट विमाने व पॅराग्लायडरवर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई- भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर दहशतवाद्यांकडून हवाई हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत ‘ड्रोन’, मायक्रोलाईट विमाने व पॅराग्लायडरवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून मुंबईत ‘अतिदक्षता’ जारी करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करून ‘ड्रोन’ विक्रेत्यांवर नजर ठेवली जाणार आहे.
सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून या हल्ल्याचा बदला घेण्याची शक्यता आहे. हवाई किंवा सागरी मार्गे हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. गुजरातच्या पोरबंदर येथे सोमवारी संशयित बोट आढळली होती. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय बीएसएफने व्यक्त केला होता. ही बोट ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, तोवर मुंबईत हल्ल्याच्या शक्यतेमुळे अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड एअर क्राफ्ट, ड्रोनवर बंदी
मुंबईत हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून मुंबईवर हल्ले करू शकतात. त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या यंत्रणांवर ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदी घातली आहे.