देशातील शालेय शिक्षणाचे वास्तव मांडण्यासाठी दहा वर्षे सतत चर्चेत राहणा-या ‘असर’ संस्थेचा २०१६ मधील सर्वेक्षणाचा अहवाल जानेवारी-२०१७मध्ये येणार आहे.
मुंबई- देशातील शालेय शिक्षणाचे वास्तव मांडण्यासाठी दहा वर्षे सतत चर्चेत राहणा-या ‘असर’ संस्थेचा २०१६ मधील सर्वेक्षणाचा अहवाल जानेवारी-२०१७मध्ये येणार आहे. ‘असर’कडून सर्वेक्षणाच्या कामालाही सुरुवात होणार असून ३० ऑगस्ट रोजी लखनौ येथे राष्ट्रीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे.
यंदा राज्यातील ‘असर’च्या राष्ट्रीय सर्वेक्षणात राज्यातील विद्यार्थ्यांचेही सर्वेक्षण होणार असल्याने त्याचे वास्तव समोर येणार असल्याची माहिती ‘प्रथम’च्या देवयानी मालगावर यांनी दिली.
‘असर’कडून मागील वर्षी राज्यात शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले नव्हते. यंदा देशातील सर्वच राज्यांत हे सर्वेक्षण केले जात आहे. ३ ते १६ वर्षे वयोगटांतील सुमारे ६ लाखांदरम्यान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जाणार आहे. यासाठी ५०० पेक्षा जास्त संस्थांतील सुमारे २५ हजारांहून अधिक कार्यकर्ते देशाच्या ग्रामीण भागातील जिल्ह्यांत पाठवून हे सर्वेक्षण केले जाईल.
यासाठी ‘असर’कडून ३० ऑगस्टपासून राष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. यात प्रत्येक राज्यांतील सुमारे १५० प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वेक्षणासाठी ‘असर’कडून १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान पनवेल येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.