देवीची विविध नऊ रूपं नवरात्रीच्या दिवसांत साद घालतात. सावली फाऊंडेशन मात्र या महिलांमधील ख-याखु-या देवींना नवशक्ती-नवचेतना पुरस्काराने गौरवणार आहे.
देवीची विविध नऊ रूपं नवरात्रीच्या दिवसांत साद घालतात. सावली फाऊंडेशन मात्र या महिलांमधील ख-याखु-या देवींना नवशक्ती-नवचेतना पुरस्काराने गौरवणार आहे. हा पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रांतील नऊ महिलांना ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता तुळशेत पाडा, भांडुप (प) येथे होणार आहे.
बिकट परिस्थितीला शरण न जाता, तिच्याशी दोन हात करून विजय मिळविणा-या अशा या महिला आहेत. नव-याने पैशासाठी विकलेली पण हिंमतीने देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वत:चं चरित्र लिहू पाहणारी किरण कुमारी चुटकी सिंग, स्वत:च्या दोन्ही मुलींना शाळेतून काढून त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देणारी, ज्यामुळे एकीला थेट अमेरिकेच्या एमआयटी संस्थेत प्रवेश मिळाला तर दुसरी फोटोग्राफी करतेय अशा मुलींची आई सुप्रिया जोशी, सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त असणा-या स्वत:च्या मुलीचं संगोपन करताना अशा आजाराने त्रस्त असणा-या इतर मुलांसाठी ‘उमंग ट्रस्ट’ सुरू करणा-या अश्विनी कराडे, शून्यातून सुरुवात करत औद्योगिक साम्राज्य उभारणा-या आरती कांबळे, भारतातील कलांना उजाळा देण्यासाठी युटय़ूबर फोक टॉकीज नावाने वाहिनी सुरू करणारी प्रणाली निमकर-देसाई, कर्तव्यदक्ष आणि कवी मनाच्या महिला पोलीस अधिकारी सुजाता पाटील, पत्रकारिता क्षेत्रात आव्हानात्मक अशा गुन्हेगारी वार्ताकन करणा-या महिला पत्रकार मनीषा म्हात्रे, नुकत्याच राज्यस्तरीय ज्युडो स्पध्रेत सुवर्णपदक पटकावणारी ११ वर्षाची चिमुरडी सिद्धी सुनील घाडगे, मराठी नाटय़-सिनेमा- संगीत अल्बम ही तिन्ही क्षेत्रे पादाक्रांत करणारी अभिनेत्री सारा श्रवण या सगळ्या अनोख्या नारीशक्तीला सावली फाऊंडेशन गौरवणार आहे.
या कार्यक्रमात जातपंचायतीशी संघर्ष करून स्वयं संघर्ष सामाजिक संस्थेचा समर्थ पर्याय देणा-या दुर्गा गुडिलू या तरुणीचा विशेष गौरव केला जाणार आहे. सदर कार्यक्रम विनामूल्य असून या नारीशक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी केले आहे.