मुंबई महापालिकेला निर्माण झाली स्मार्ट सिटीचा दर्जा मिळण्याची आशा.
मुंबई- जागतिक व्यापार केंद्र आणि देशाची आर्थिक राजधानी असूनही भाजप आणि शिवसेनेच्या राजकारणामुळे ‘स्मार्ट सिटी’ योजनेपासून आतापर्यंत बाहेर राहिलेल्या मुंबईचा अखेर या महत्त्वाकांक्षी योजनेत समावेश करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. त्यानुसार या योजनेच्या अखेरच्या टप्प्यात मुंबई आणि अमरावती महापालिकाचे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केंद्र सरकारने गुरुवारी राज्य सरकारला दिले आहेत.
स्मार्ट सिटीसाठी नियुक्त तज्ज्ञांच्या मदतीने हे प्रस्ताव लवकर तयार करावेत असे नगरविकास विभागाने दोन्ही महापालिकांना सूचित केले आहे. त्यामुळे उशिरा का होईना मुंबई महापालिकेलाही स्मार्ट सिटीचा दर्जा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच वर्षात देशातील १०० शहरे स्मार्ट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या योजनेत निवड झालेल्या महापालिकांना पाच वर्षात प्रत्येकी पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत.त्यामध्ये केंद्राकडून वर्षाला १०० कोटी तर राज्य सरकारकडून ५० कोटी मिळणार असून ५० कोटी महापालिकांना खर्च करावे लागणार आहेत.
या योजनेसाठी राज्य सरकारने मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर अशा १० शहरांचे प्रस्ताव पाठविले होते. पहिल्या टप्प्यात पुणे आणि सोलापूर तर दुस-या टप्प्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि तिसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाली आहे. राज्य सरकारने नवी मुंबई महापालिकेचा या योजनेत समावेश केला होता.
मात्र महापालिकेने या प्रस्तावास विरोध करीत या योजनेत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला. तर मुंबई महापालिकेने कोणतीच स्पष्ट भूमिका घेतली नव्हती.भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्षामुळे हा प्रस्ताव रखडला होता. मात्र आता अखेरच्या टप्प्यात राज्यातील उर्वरित दोन्ही शहरांचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहेत. मात्र हे प्रस्ताव पाठविताना स्मार्ट सिटीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या मदतीने परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. ३१ ऑक्टोबपर्यंत दोन्ही शहरांचे प्रस्ताव पाठविण्याचे सूचित करण्यात आले आहे.
[EPSB]
वाहन नोंदणीचे काम परिवहन विभागाकडून काढून वितरकांकडे सोपवण्याचा घाट घालण्यात येत आहे.
[/EPSB]