गणरायाच्या विसर्जनावेळी कुठलाही अपप्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
मुंबई- आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर आता वेध लागले आहेत, ते १० दिवसांच्या बाप्पांना जयघोष, ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्याचा. गणरायाच्या विसर्जनावेळी कुठलाही अपप्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. दरम्यान, विसर्जनाच्या कालावधीत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ४९ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तर ५५ रस्त्यांवरील वाहतूक एकेरी मागार्ने सुरू राहणार आहे. याशिवाय १८ रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. याशिवाय ९९ रस्त्यांवरील पार्किंग विसर्जन कालावधीत बंद राहणार आहे.
मुंबईतील बाप्पांच्या विसर्जनावेळी यंदा ठिकाणांवरील सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. तसेच बंदोबस्तासाठी तब्बल १४ हजार सशस्त्र पोलिसांची फौज रस्यावर तैनात असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन काळात मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल, असे त्यांनी म्हटले आहे. विसर्जनाच्या मार्गावर वॉच टॉवर उभारले जाणार आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आधीच लावण्यात आले असून मुख्य नियंत्रण कक्षातून या कॅमे-यांद्वारे नजर ठेवता येईल, असे अधिका-यांने स्पष्ट केले.
विसर्जन कालावधीत रुग्णवाहिकांना रस्ता द्या
लाडक्या गणरायाचे आगमन जितक्या जल्लोषात केले तितक्याच जल्लोषात निरोप देण्यासाठी भक्तगणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी १० दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन असून विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुंबईतील प्रत्येक रस्त्यांवर भाविकांची एकच गर्दी असते. गर्दीतून वाट काढत चालणे या दिवशी शक्यच नसते. त्यामुळे रुग्णांना घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांना रस्ता द्यावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी गणेश मंडळ व भक्तांना केले आहे.
मुंबईतील मानाच्या गणपतीचे मंडपात जाऊन दर्शन घेणे काही भाविकांना शक्य नसते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्याआधी त्याला पाहण्यासाठी घराघरातून भक्त बाहेर पडतात. अनंत चतुर्थीला गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईतील सगळ्यांना रस्त्यांवर भक्तांची एकच गर्दी असते. माणसाला पाय ठेवण्यासाठी जागा नसते. बाप्पाला निरोप देण्याचा भक्तांचा उत्साह कोणीही समजू शकतो. मात्र या विसर्जन कालावधीत काही रुग्णांची प्रकृती अवस्थ असून त्यांना तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे असते. मात्र विसर्जन सुरू असल्याने रस्त्यावर जागा नसते आणि रुग्णवाहिकेच्या चालकाला मार्ग काढणे कठीण होते. यावेळी आपण माणूस म्हणून आपले कर्तव्य बजावत रुग्णवाहिकेला मार्ग द्यावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांबरोबर दै. ‘प्रहार’ने ही केले आहे.
गणपती विसर्जनानिमित्त पश्चिम रेल्वेच्या विशेष फे-या
गणेशोत्सवात ओसंडून वाहणारा मुंबईकरांचा जल्लोष अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिगेला पोहोचतो. विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू राहात असल्याने रात्रभर जागणा-या मुंबईकरांच्या रंगाचा भंग होऊ नये; याकरता पश्चिम रेल्वेने दरवर्षीप्रमाणे यंदाही रात्री चार विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर चर्चगेट-विरार मार्गावर विशेष फे-या चालवल्या जातील.
गणेश विसर्जनानिमित्त चालवली जाणारी पहिली विशेष लोकल चर्चगेटवरून विरारच्या दिशेने डाऊन मार्गावर रात्री १.१५ वाजता सोडण्यात येईल, ही गाडी विरारला रात्री २.४७ वाजता पोहोचेल. तर दुसरी गाडी चर्चगेटवरून १.५५ वाजता निघून ती विरारला पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. तिसरी गाडी चर्चगेटवरून रात्री २.२५ वाजता निघाल्यावर पहाटे ४ वाजता विरार गाठेल. त्यानंतर शेवटची चौथी फेरी ३.२० वाजता चर्चगेटवरून सोडल्यानंतर विरारला पहाटे ४.५५ ला पोहोचेल.
विशेष लोकल वेळापत्रक
चर्चगेट-विरार
पहिली लोकल- रात्री १.१५ वाजता
दुसरी लोकल- रात्री १.५५ वाजता
तिसरी लोकल- रात्री २.२५ वाजता
चौथी लोकल- रात्री ३.२० वाजता
विरार- चर्चगेट
पहिली लोकल- रात्री १२.१५ वाजता
दुसरी लोकल- रात्री १२.४५ वाजता
तिसरी लोकल- रात्री १.४० वाजता