कुठलेही काम झपाटल्यासारखे करावे, असे म्हणतात. अशाप्रकारच्या कामामुळे तुमची वेगळी ओळख राहते. तसेच कामाचा पुरेपूर आनंद मिळतो. मराठी चित्रसृष्टीत महेश कोठारे असेच एक झपाटलेले निर्माता, दिग्दर्शक आहेत. चित्रपट असो किंवा मालिका, काहीतरी वेगळे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या पौराणिक मालिकेतही महेश कोठारे यांनी नवनवे प्रयोग केलेत. मालिकेतील अभिनव प्रयोगांसह भविष्यातील प्रोजेक्टबाबत त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा.
गणपतीची सोंड हलती ठेवण्याची अभिनव कल्पना
मला नेहमीच काहीतरी वेगळे करायला आवडते. एकच प्रकार पुन्हा पुन्हा करण्यात मला रस नाही. त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरया’ या पौराणिक मालिकेत एक नवा आणि अभिनव प्रकार केला. तो म्हणजे गणपतीची सोंड सतत हलताना दाखवणे. आजवर श्री गणेशावर अनेक मालिका, चित्रपट आले. मात्र कोणीही तसे करण्याचे धाडस दाखवले नाही. ही खरोखर मोठी गोष्ट आहे. गणपतीची सोंड अॅनिमेट केली आहे. सोंड हलवताना दाखवण्याचा प्रयोग प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. भावला आहे. सतत पाहण्यामुळे त्यातली मेहनत लक्षात येत नसेल पण तो रोज तसे करणे फार कठीण आहे. यासाठी खूप मेहनत, परिश्रम घ्यावे लागतात. हे तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न आहे.
आव्हान स्वीकारले आणि प्रत्यक्षात उतरवले
गणपतीची सोंड हलवताना दाखवण्याचे आव्हान मी स्वीकारले. हे आव्हान प्रत्यक्षात साकारण्याचे आव्हान होते. ही सोंड अॅनिमेट्रॉनिक्सची करायची का, असा पहिला विचार आला. अॅनिमेट्रॉनिक्ससाठी आम्ही खूप मेहनत केली. सोंड बनवून गणपतीच्या तोंडावर चिटकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे बालगणेशाची भूमिका साकारणा-या कलाकाराला त्याचा खूप त्रास झाला. त्याच्या चेह-याला गम सूट झाले नाही. ओरखडे (रॅशेस) पडले. त्याला सोंडेचे वजनही पेलेना. त्यामुळे इतका खर्च करून सर्व फुकट गेले. त्यानंतर अॅनिमेट्रॉनिक्स सोंड लावण्याचा प्रयोग थांबवावा लागला. मग काय करायचे, असा प्रश्न पडला. हा प्रश्न सोडवण्यात माझा मुलगा आदिनाथचा मोठा सहभाग आहे.
सोंड लावण्याचा इफेक्ट साकारण्यासाठीच्या क्रिएटिव्ह टीममध्ये त्याने पहिल्यापासून लक्ष घातले. ही सोंड संगणकाद्वारे (अॅनिमेट) बनवण्याचे आम्ही ठरवले. हे आव्हान अदिनाथने पेलले. त्यानंतर आम्ही व्हीएफएक्स टीमची मिटिंग घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. दैनंदिन मालिका असल्याने रोजच्या रोज काम होते. ते होऊ शकेल का, याबाबत चर्चा केली. आमच्या टीमने त्यावर आम्ही काम केले. एक ‘प्रॉपर्टी’ तयार केली. संगणकाच्या भाषेत एक ‘अॅसेट’ तयार केले. ते असे बनवले की सोंड केव्हाही आणि कशीही हलवता येऊ शकेल. शूटिंगदरम्यान गणपतीच्या चेह-यावर सोंड अॅडजस्ट केली जाते. गणेशाची भूमिका साकारणा-या पात्राच्या सतत हालचाली होत असल्याने हे काम निश्चितच सोपे नाही.
खूप संशोधन करून ‘कंटेट’ तयार केला
गणपती दैवत सर्वाना प्रिय आहे. त्यामुळे नसलेल्या गोष्टी मालिकेत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा मालिका करताना उपलब्ध ग्रंथांचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही एक संशोधन (रिसर्च टीम) उभी केली आहे. या टीमने खूप अभ्यास, मेहनत करून ‘कंटेट’ लिहिला आहे. या टीममध्ये अजिंक्य ठाकूर, किरण शिंदे यांचा समावेश आहे. किरणचा पुराणांबाबतचा अभ्यास दांडगा आहे. श्री गणेशाच्या सर्व पुराणांचा सखोल अभ्यास आमच्या टीमने केला आहे. त्यावर आधारित मालिकेचा प्रत्येक एपिसोड बनवला जातो.
मालिका ‘फिक्शन’ वाटायला नको. सिनेमॅटिकली सादरीकरण लोक समजून घेतात. मात्र फिक्शन टाकण्याचा आमचा कटाक्ष होता. मालिका चांगली आणि परिणामकारक बनवण्यासाठी चॅनेलचाही मोठा पाठिंबा असेल. ईपी वैभव जोशी हा आमच्यासोबत कायम असतो. प्रत्येक गोष्टीत जातीने लक्ष घालतो. तसेच खूप मेहनत घेतो. गणपतीवर मालिका बनवण्यासह सोंड हलवताना दाखवण्याचा दुर्मीळ ‘इफेक्ट’ दाखवण्याची संधी दिल्याबद्दल मी कलर्स मराठी वाहिनीचा आभारी आहे. या मालिकेत सोंड कायम हलवताना दाखवण्यासह यापूर्वी न दाखवलेले किंवा केलेले ‘इफेक्ट’ आम्ही केले आहेत. सुरुवातीला अनेक आव्हाने आमच्यासमोर होती. ती यशस्वीपणे पेलवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
पुढील वर्षी ‘झपाटलेला-३’ प्रदर्शित होणार
मी १९८५ पासून चित्रपट दिग्दर्शित करतोय. मात्र झपाटलेला-२ नंतर (२०१३) मी चित्रपट केला नाही. चित्रपट केला नाही तरी मालिका तसेच खूप काही केले. झपाटलेला-३ पुढील वर्षी तुमच्या भेटीला येईल. या चित्रपटातही नवा प्रयोग करतोय. तात्या विंचूला आम्ही ‘क्रिएट’ करतोय. ते अॅसेट बनवण्यासाठी खूप वेळ लागला. केवळ प्रयोग म्हणून नाही तर कुठलाही प्रयोग चांगला व्हावा आणि लोकांच्या पसंतीस पडावा, यासाठी माझा आग्रह असतो. ‘जंगल बुक’मध्ये ज्याप्रमाणे प्राणी बनवलेले (क्रिएट केलेले) आहेत किंवा ‘लाईफ ऑफ पाय’मध्ये जो वाघ हुबेहूब तयार करण्यात आला आहे, त्या लेव्हलचे काम करत आहोत. हा चित्रपट थिएटरमध्ये लागेल, तेव्हा हंगामा होईल.
सतत व्यग्र राहण्याचा प्रयत्न असतो
चार वर्षात चित्रपट आला नाही तरी रिलॅक्स वगैरे नव्हतो. तसा वेळ मिळत नाही. सतत व्यग्र राहण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण काम करायचे आहे, हे माझ्या मनात असते. मी माझ्या प्रॉडक्शन कंपनीचा विस्तार केला आहे. त्यामुळे एकाहून अधिक कामे (मल्टिटास्किंग) होऊ शकतात. एकावेळी दोन-तीन प्रोजेक्ट सहज करू शकतो. माझ्याकडे मोठी टीम आहे. कुशल तंत्रज्ञ आहे. दिनेश कोयंडेसारखा सीईओ आहे. माधुरी पाटकरसारखी एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर आहे. शिवाय आदिनाथ माझ्या खांद्याला खांदा देऊन उभा आहे. निर्मिती प्रक्रियेत उर्मिलाचाही मोठा सहभाग आहे. निलिमा कोठारे आणि नीता खांडगे यांचा कॉस्च्युमचा सपोर्ट आहे. चांगल्याप्रकारे आणि दिलेले काम करणारे सहकारी असल्यामुळे माझे काम अधिक चांगले आणि परिणामकारक होताना दिसत आहे.
माझ्यासारखा फँटसी कॉमेडी चित्रपट कोणाला जमली नाही
कॉमेडी करणे सोपे नाही. ते खूप अवघड काम आहे. त्यातही चांगली कॉमेडी करणे, मोठे दिव्य असते. गेल्या काही वर्षात अनेक छोटे-मोठे कॉमेडी चित्रपट आले पण लोकांना आवडले नाहीत. त्यामुळे कॉमेडीमध्ये वेगळेपण पाहायला मिळाले नाही. माझी एक स्टाईल होती. फॅन्टसी कॉमेडीचा प्रकार मी करत आलो. लक्ष्यासारखी कॉमेडी करणे आणि माझ्यासारखे कॉमेडी चित्रपट करणे, कोणाला जमले नाही. मात्र २०१८मध्ये ‘झपाटलेला-३’ येईल, त्यावेळी धम्माल होईल.
आदिनाथ निवडक चित्रपट करतो
आदिनाथ हा प्रोजेक्टच्या ‘इन्स्पिरेशन’वर जातो. एखादी भूमिका आवडली किंवा भावली की, नाटक, सिनेमा किंवा मालिका हे तो बघत नाही. त्याला ‘हंड्रेड डेज’मधील भूमिका आवडली. आणि मुख्य म्हणजे शंभर दिवसांचीच ती ‘कमिटमेंट’ होती. त्याला ती मालिका मनापासून करावी वाटली, म्हणून त्याने केली. मी हे करणार नाही. ते करणार नाही असे तो कधीही म्हणत नाही. कथानक आणि कॅरेक्टर आवडले की तो मागेपुढे पाहत नाही. तो खूप ‘चुझी’ आहे. त्याने सरसकट भूमिका आणि चित्रपट करायचे ठरवले असते तर झपाटलेला-२ नंतर त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली असती.
अनेक जण भराभर चित्रपट करतात. आपल्याकडे असे अनेक कलाकार आहेत. मात्र चित्रपट केव्हा प्रदर्शित होतात, हे त्यांना माहीतदेखील नसते. आदिनाथने सरसकट चित्रपट केले नाहीत. मोजके आणि चांगले चित्रपट केले. मालिकेत रोज दिसणा-या कलाकाराला पडद्यावर का पाहायचे, असा पूर्वी एक समज होतो. पण आता तसे काही उरलेले नाही. हल्ली अनेक कलाकार नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही प्रकारांत दिसतात.
आदिनाथ त्याच्या चित्रपटाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतलाय
आदिनाथ सध्या स्वत:च्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. एक चित्रपट महत्त्वाकांक्षी करत आहे. दिग्दर्शक आणि कलाकार अशी दुहेरी भूमिका तो साकारतोय. या चित्रपटाचे नाव ‘पाणी’. या चित्रपटासाठी त्याने खूप चांगले ‘स्क्रिप्ट’ बनवले आहे. मराठवाडय़ात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटावर त्याने लक्ष केंद्रित केले आहे.
माझी परंपरा आदिनाथ पुढे नेत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. लोकांना चांगले देण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. आदिनाथही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा मला विश्वास वाटतो. मी त्याला अभिनय आणि दिग्दर्शनासाठी कधी सक्ती केली नाही. आदिनाथ एक चांगला विद्यार्थी होता. आपला अभ्यास वेळेवर आणि चांगल्याप्रकारे करायचा. तो चांगले गुण मिळवून पास झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे तो कधीही नापास झालेला नाही. प्राथमिक शाळा ते एमबीएपर्यंत तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. तोही पहिल्या श्रेणीमध्ये. मी त्याला घेऊन ‘माझा छकुला’ हा चित्रपट केला होता.
शाळेच्या सुट्टीदरम्यान हा चित्रपट केला होता. चित्रपट क्षेत्राचे पाणी प्यायलेल्या माणसाला दुस-या कुठल्याच क्षेत्राचे पाणी गोड लागत नाही, अशी आपल्याकडे म्हण आहे. तसेच बहुधा आदिनाथबाबत घडले असावे.
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ एक सर्वोत्कृष्ट मालिका
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’मध्ये मला परीक्षक म्हणून संधी दिल्याबद्दल मी कलर्स मराठी वाहिनीचा आभारी आहे. या शोमध्ये खूप टॅलेंट बघायला मिळते. यातील सहभागी कलाकार खूप गुणवान आहेत.
मालिकेचे लेखकही टॅलेंटट आहेत. सर्वासोबतचा अनुभव विलक्षण आहे. शूटिंगदरम्यान खूप फ्रेश वाटते. प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करतो. सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांच्या स्क्रिप्टही चांगल्या असतात. कलाकारांसह त्यांचेही कौतुक करावे तितके कमी आहे. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ही खरोखर एक चांगली कॉमेडी मालिका आहे.