यापुढे स्त्री, पुरुष यासोबतच तृतीयपंथीयांनाही कायदेशीर मान्यता आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार यासोबतच शासनाच्या सर्व सवलतींचा लाभ घेण्यास तृतीयपंथी पात्र असतील असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयातर्फे गेल्या वर्षी देण्यात आला होता.
मुंबई – यापुढे स्त्री, पुरुष यासोबतच तृतीयपंथीयांनाही कायदेशीर मान्यता आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार यासोबतच शासनाच्या सर्व सवलतींचा लाभ घेण्यास तृतीयपंथी पात्र असतील असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयातर्फे गेल्या वर्षी देण्यात आला होता. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असून समाजात तृतीयपंथीयांना अद्यापही स्वीकारले जात नसल्याची खंत त्यांनी ‘भारतीय हम भी है’ या व्हीडिओच्या माध्यमातून मांडली आहे. ‘आमच्या स्वातंत्र्याचे काय?’ असा सवाल करत वकील, विमानचालक, पोलीस अधिकारी, शिक्षक होऊ पाहणाऱ्या तृतीयपंथीयांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अडीच मिनिटांच्या व्हिडीओच्या माध्यमातून सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे.
‘यथार्थ पिक्चर्स’ या संस्थेतर्फे बनवण्यात आलेला अडीच मिनिटांचा हा व्हिडीओ युटय़ूबवर सध्या गाजत आहे. या व्हिडीओमध्ये तृतीयपंथी ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत एकसुरात गाताना दिसत आहेत. या व्हिडीओचे वैशिष्टय़ म्हणजे शिक्षक, वकील, पोलीस, डॉक्टर, शेफ, विमानचालकाच्या वेशात तृतीयपंथी दिसत आहेत. समाजात तृतीयपंथी असा वर्ग आहे ज्याला स्वीकारण्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिसून येतात. मात्र गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या वर्गाला कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शासनाने योग्य पावले उचलत त्यांना आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही न्यायालयाने दिले. या निर्णयाचे देशातील तृतीयपंथीयांकडून स्वागत करण्यात आले असल्याचे या व्हिडीओमध्ये दाखवले आहे.
यामुळे त्यांचे समाजातील स्थान आणि नागरिक म्हणून त्यांचे असलेले अधिकार कायदेशीररीत्या मान्य होतील. पण अजूनही शासकीय आणि सामाजिक पातळीवर बरेच परिवर्तन करणे गरजेचे आहे. उच्चशिक्षण घेत आम्हीही प्रत्येक क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करून घेऊ शकतो. मात्र हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा हा समाज आम्हाला नागरिक म्हणून स्वीकारेल कारण आम्हीही भारतीय आहोत, असा संदेश या व्हिडीओद्वारे दिला गेला आहे. युटय़ूबवर हा व्हिडीओ ७५ हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे.