देशातील संवेदनशील कारागृहांपैकी एक असलेल्या आर्थर रोड कारागृहात दोन मोबाइल आणि तीन सिम कार्ड सापडले आहेत.
मुंबई- देशातील संवेदनशील कारागृहांपैकी एक असलेल्या आर्थर रोड तुरुंगातील शौचालयात दोन मोबाइल व तीन सिम कार्ड सापडल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मंगळवारी एका कैद्याला अटक केली. आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक ४ मध्ये शनिवारी हे मोबाइल सापडले होते. या प्रकरणी आणखी तीन कैद्यांच्या सहभागाबाबतही पोलिसांना संशय आहे.
आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक ४मधील चार आरोपी एकनाथ रतन निकम (कैदी क्रमांक ४९९०), मोहम्मद तमन्ना शफीक अन्सारी (कैदी क्रमांक ३०५७), नीलेश राकेश नायर (कैदी क्रमांक ३७४८) व सुशांत वसंत साळुंखे (कैदी क्रमांक ९११४) यांना ठेवण्यात आले होते. या बराकमध्ये मोबाइलचा वापर होत असल्याचा संशय कारागृह प्रशासनाला आला होता. त्यानुसार शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत या बराकची झडती घेण्यात आली. त्यात शौचालयाची झडती घेतली असता तेथे दोन मोबाइल व तीन सिमकार्ड सापडले.
याबाबत सर्व कैद्यांना विचारणार केली असता सर्वानी या सिमकार्डशी संबंध नसल्याचे सांगितले. त्यानुसार या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी संशयीत म्हणून साळुंखेला मंगळवारी अटक करण्यात आली. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अभिषेख नामपल्ले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला.
कारागृहात सापडलेले मोबाइल व सिमकार्डच्या सहाय्याने कोणाकोणाला दूरध्वनी करण्यात आले, याबाबतची माहिती घेण्यासाठी मोबाइल कंपनीशी पोलिसांनी संपर्क साधला असून, त्याबाबतची माहिती कंपनीकडून अद्याप प्रलंबित असल्याचे माहीतगारांनी सांगितले. या प्रकरणात कारागृहातील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत. साळुंखे याच्यावर गंभीर हल्ला व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी आर. ए. के मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे साळुंखे याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते.
कारागृहाच्या आधुनिकीकरणासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात नुकतेच ७२ नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय आणखी २० सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच आर्थर रोड कारागृहात बसवण्यात येणार आहेत. देशातील संवेदनशील कारागृहांपैकी एक असलेल्या आर्थर रोड कारागृहात गेल्या महिन्यात एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याशिवाय महिनाभरापूर्वीच एका कैद्याला सिमकार्ड घेऊन जात असताना पकडण्यात आले होते. अशा विविध घटना लक्षात घेता आर्थर रोड कारागृहात २० जॅमर्सही बसवण्यात आले आहेत. पण, तरीही असे प्रकार सुरूच असल्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.