परदेशात औषधे निर्यात करत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेचा ‘ना हरकत’ दाखला (एनओसी) घेणे आवश्यक असते.
मुंबई – परदेशात औषधे निर्यात करत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेचा ‘ना हरकत’ दाखला (एनओसी) घेणे आवश्यक असते. मात्र बनावट ‘एनओसी’च्या आधारे औषधे पाठवण्यात येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. अन्न औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईत १० लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली.
विदेशी टपालाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तूंचे पार्सल विमानातून परदेशात पाठवले जाते. अशा प्रकारे पुरुषांसाठी उत्तेजक असलेल्या औषधांची ९६ पाकिटे एका पार्सलमधून निर्यात करण्याची तयारी झाली होती. हा माल विदेशी पोस्ट ऑफिसमध्ये आल्यानंतर ड्रग कंट्रोलर संस्थेच्या तांत्रिक अधिका-यांना संशय आला.
एफडीएच्या अधिका-याने या पार्सलची तपासणी केली असता या पार्सलवरील ‘ड्रग कंट्रोलर’चा शिक्का व निर्यातीसाठीची कागदपत्रे बनावट असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. अशा तऱ्हेने अवैध पद्धतीने औषधांची निर्यात सुरू असल्याचा पर्दाफाश झाला. संबंधित वितरकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आल्याचे एफडीएचे अधिकारी ए. जटाधर यांनी ‘प्रहार’ला सांगितले.