क्षुल्लक कारणांवरून होणारी भांडणे, काही कारणास्तव रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाईक संतप्त होणे, रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक हजर नसणे असे प्रकार सरकारी रुग्णालयांत होतात.
मुंबई- क्षुल्लक कारणांवरून होणारी भांडणे, काही कारणास्तव रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाईक संतप्त होणे, रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक हजर नसणे असे प्रकार सरकारी रुग्णालयांत होतात. गेल्याच आठवडय़ात केईएम रुग्णालयात हलगर्जीमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या सर्वाची दखल अखेर केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाला घ्यावी लागली. रात्रीच्या वेळी रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी हे अशा प्रकारांवर नजर ठेवून असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने प्रथमच हे पाऊल उचलण्यात आल्याचे रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या केईएम रुग्णालयात देशाच्या कानाकोप-यातून रुग्ण उपचाराकरता येत असतात. खासकरून रात्रीच्या वेळी परजिल्ह्यातून उपचाराकरता येणा-या रुग्णांची संख्या जास्त असते. गेल्याच आठवडय़ात भिंवडी येथून उपचाराकरता आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच एका रुग्णाचा मृतदेह शवागारात न नेता तो काही तास रुग्णालयातील रक्तपेढीजवळ ठेवण्यात आला होता. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली. पण, तेवढय़ावरच न थांबता असे प्रकारच घडू नयेत, याकरता रुग्णालय प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यानुसार डॉ. पारकर या स्वत:ही रात्रीच्या वेळी रुग्णालयात गस्त घालतात.
यापुढे सहाय्यक वैद्यकीय अधिका-यांना रात्रीच्या वेळी रुग्णालयात काही गोंधळ होऊ नये, यासाठी गस्त घालावी लागणार आहे. खासकरून अतिदक्षता विभाग, अपघात विभाग, शस्त्रक्रिया विभाग आदी ठिकाणी डॉक्टरांना रात्री पाहणी करावी लागणार आहे.
बहुतांश वेळा याच विभागात नातेवाइकांनी गोंधळ घातल्याच्या घटनांची नोंद आहे. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णास एक्स- रे, किंवा वॉर्डात दाखल करून घेतल्यानंतर काही सुविधा न मिळाल्यासही नातेवाईक हे डॉक्टर, परिचारिका यांच्याशी वाद घालतात. अशा वेळी रात्री गस्तीला असणा-या सहाय्यक वैद्यकीय अधिका-याने तत्काळ ही बाब सुरक्षारक्षकांना कळवल्यास दुर्घटना रोखता येतील, हा यामागील मुख्य हेतू असल्याचे डॉ. पारकर यांनी ‘प्रहार’ला सांगितले.
रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक जागे असतात का, याची नोंदही करण्यात येईल. या सर्वाचा आढावा घेऊन तो अहवाल दुस-या दिवशी अधिष्ठाता कार्यालयास सादर केला जाणार आहे.