चलनी नोटा मोजण्यासाठी बेस्टच्या विविध बस आगारांत प्रशासनातर्फे २७ यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मुंबई – चलनी नोटा मोजण्यासाठी बेस्टच्या विविध बस आगारांत प्रशासनातर्फे २७ यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र त्यांपैकी तब्बल १५ यंत्रांत बिघाड झाला असून, रोजची येणारी रक्कम मोजताना कर्मचा-यांची दमछाक होत आहे.
शुक्रवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्ट समिती सदस्यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे आेढले. दरम्यान, काही यंत्रांत बिघाड झाला असून, ती मोडीत काढण्यात येणार आहेत. तसेच लवकरच नवीन यंत्रे खरेदी करण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक आे. पी. गुप्ता यांनी बैठकीत स्पष्ट केले.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाअंतर्गत बेस्ट उपक्रमास दररोज ३ कोटी ७६ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. तर विद्युत विभागाकडूनही महिन्याला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळतो. बेस्ट उपक्रमास प्राप्त होणारा महसूल विविध बँकांमध्ये जमा करण्यात येतो. मात्र बँकांमध्ये जमा करण्यापूर्वी बस आगारांमध्ये नोटा मोजल्या जातात.
बॅक-बे, मुलुंड, वांद्रे, गोराई, धारावी, कुलाबा, मजास, मुंबई सेंट्रल, प्रतीक्षानगर, कुर्ला, सांताक्रूझ, विक्रोळी, पोईसर आणि वडाळा बस आगारांत येणारी रोख रक्कम मोजण्यासाठी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मात्र नोटा मोजणाऱ्या यंत्रांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. बेस्ट उपक्रमाचा रोजचा रोख व्यवहार असून, पैशाबाबत सावधानता बाळगणे गरजेचे असते. पैसे मोजण्यात चूक झाल्यास त्याचे खापर कर्मचा-यांवर फुटण्याची शक्यता असते.
यंत्रांच्या दुरुस्तीबाबत कंत्राटदारही निष्काळजीपणा करत असून, दुरुस्तीनंतर पुन्हा बिघाड कसा होतो, असा प्रश्न बेस्ट समिती सदस्यांनी उपस्थित केला. कोटय़वधी रुपये हाताने मोजणे कर्मचा-यांना शक्य नाही. त्यामुळे बिघाड झालेली यंत्रे त्वरित दुरुस्ती करून घ्यावीत, अशी मागणी समिती सदस्यांनी केली.
दरम्यान, काही कारणास्तव यंत्रात बिघाड झाले आहेत. यंत्राची वयोमर्यादा १२ वर्षे असून, त्याची योग्य प्रकारे देखभाल केली जाते. मात्र काही कारणास्तव ती खराब झाल्याने ती मोडीत काढण्यात येणार आहेत. तसेच लवकरच नवीन यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.