लाडक्या बाप्पासाठी मोदक, दागिने, वस्त्र, पूजेचे साहित्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई, ठाण्यातील बाजारपेठा फुलल्या आहे.
मुंबई- गणरायाचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले आहे. आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक, दागिने, वस्त्र, पूजेचे साहित्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई, ठाण्यातील बाजारपेठा फुलल्या आहे. फुल, फळांच्या किंमती गगनाला भिडल्या तरी भक्तांचा आनंद ओसंडून वाहत आहे. कलाकुसर केलेल्या मोदकासाठी किलोला पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत.
‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात अवघी मुंबापुरी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली. अवघ्या काही तासांमध्ये बाप्पाचे घराघरात व मंडपात मोठय़ा दिमाखात स्वागत होणार आहे. बाप्पाच्या तयारीसाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. सकाळपासून, मध्यरात्रीपर्यंत या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या.
फुलमार्केटमध्ये केशरी व पिवळ्या झेंडूची फुले ८० रुपये किलो आहेत. गुलाबाच्या दहा फुलांसाठी २० रुपये तर २० फुलांसाठी ३० रुपये मोजावे लागत आहेत. तुळशीची एक जुडी १० रुपये तर आंब्याच्या पानाची जुडी ५ रुपयांना विकली जात आहे. विड्याची पाने २५ रुपयांना दुर्वाची जुडी ५ रुपये असे दर फुलांचे असून, आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी गरीबांपासून श्रीमंतांची खरेदीसाठी तुफान गर्दी दादरसह अन्य मार्केटमध्ये उसळली होती. कंठीमाळ, हारतुरे, मखर आदी वस्तू खरेदी करण्यासाठी दादरसह मुंबईतील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी होती.
त्यातच गणपतीसाठी गावी जाणा-यांचीही लगबग सुरू असल्याने मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र आपल्या लाडक्या बाप्पासाठी वाहतूक कोंडीतून मार्ग काढत बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात मुंबईकर मग्न झाले आहेत.
फुलमार्केट बाप्पाच्या आवडत्या जास्वंदाच्या फुलांसाठी भक्तांना वणवण करावी लागत आहे. फुलविक्रेत्यांना जास्वंदाच्या फुलांबद्दल सांगितले की, ग्राहक भल्या पहाटे येऊन जास्वंदाची फुले घेऊन जातात. त्यामुळे दुपापर्यंत ही फुले मिळत नाहीत. बाप्पाला खूश करण्यासाठी कोणत्याही किमतीत ग्राहक जास्वंदाची फुले खरेदी करताना दिसत आहेत.
गणेशोत्सवानिमित्त विविध वस्तूंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. केवड्याच्या एका पानासाठी दीडशे रुपये मोजावे लागत आहेत. तर कणसाची किंमत २५० ते ३०० रुपयांपर्यंत गेली आहे. ठाण्याचा फुलबाजार विविध प्रकारच्या सुंदर व आकर्षक फुलांनी सजला असला तरी त्यांचे भाव वधारले आहेत.
गणपतीला मोदक प्रिय आहेत. त्यामुळे सध्या मिठाईच्या दुकानात ३०० पासून ५ हजार रुपये किलोने मोदक उपलब्ध आहेत. माव्यापासून बनवण्यात येणारे मोदक स्वस्त असले तरी काजू, बदाम,चॉकलेट, स्ट्रॉबेरीपासून बनवलेल्या मोदकांचे भाव चढे आहेत.
गॅलॅक्सी, विणामोदक, शंखमोदक, बदाम कोकोनट, बदाम जिनुकमोदक, पपईच्या आकारातील मोदक महागड्या भावाने विकण्यात येत आहेत. त्यांच्यावर केलेल्या कलाकुसरीनुसार व वापरलेल्या मालानुसार या मोदकांचे भाव ठरलेले आहेत.