आता नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांसाठी गोड बातमी असून त्यांना सहा महिने किंवा जास्त कालावधी पूर्ण झाला असल्यास १ जुलैपासून लागू होणा-या वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या सेवेत लागणा-या कर्मचा-यांना वर्ष पूर्ण झाल्यानंतरच वेतनवाढ लागू व्हायची. त्यामुळे बहुतांश कर्मचा-यांना दीड वर्ष या वेतनवाढीचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांसाठी गोड बातमी असून त्यांना सहा महिने किंवा जास्त कालावधी पूर्ण झाला असल्यास १ जुलैपासून लागू होणा-या वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. पालिका प्रशासनाने यावर निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या धर्तीवर पालिकेच्या कर्मचा-यांना वार्षिक वेतनवाढ १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. यात नव्याने सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांच्या पहिली वेतनवाढ त्यांचा एका वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देण्यासंबंधी तरतूद आहे. मात्र सहाव्या वेतन आयोगानुसार सर्व कर्मचा-यांना १ जुलै रोजी वेतनवाढ द्यावयाची असल्याने अशा कर्मचा-यांबाबत नियुक्तीनंतर १ जुलैला सहा महिने किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण झाल्यावर पहिली वेतनवाढ देण्यात येईल, असे पालिकेच्या प्रमुख लेखापालांनी स्पष्ट केले. यासाठी पालिकेच्या नियमांत सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अन्य रजेवर असलेल्या कर्मचा-यांना तसेच नव्याने नियुक्ती झालेल्या कर्मचा-यांना पहिली वार्षिक वेतनवाढ कशाप्रकारे द्यायची, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे सरकारी निर्णयानुसार पालिकेच्या नियमांत सुधारणा करणे आवश्यक आहे. यात जो कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी रजेवर राहिल्यास त्याला वार्षिक वेतनवाढ दिली जाणार नाही. मात्र सहा महिने किंवा त्याहून कमी कालावधीसाठी रजेवर असल्यास त्यांना वार्षिक वेतनवाढ दिली जाईल, असे प्रमुख लेखापालांनी स्पष्ट केले.