पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा झालेली मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई – पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा झालेली मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या बुलेट ट्रेनच्या कामासाठी लागणारे आर्थिक साहाय्य करण्यास इच्छुक असलेल्या चीनचे शिष्टमंडळ सीएसटीला भेट देण्यासाठी आले होते. त्या वेळी या बुलेट मार्गातील मुंबई व अहमदाबाद हे टप्पे स्थानकांसह भुयारी मार्गे चालवणे अधिक सोयीचे ठरेल. बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यासाठी चिनी तंत्रज्ञान असल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागू शकतो, असे मत चीनच्या परिवहन मंत्रालयाचे उपमंत्री आणि नॅशनल रेल्वे अॅडमिनिस्ट्रेशनचे मुख्य अधिकारी लू डाँग फू यांनी व्यक्त केले.
पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे वेगवान ट्रेनचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केंद्राकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. बुलेट ट्रेनसाठी जपान व चीन या दोन देशांशी अर्थसाहाय्य व तंत्रज्ञान मिळवण्यासाठी भारताकडून तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी चीनच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी टर्मिनसला भेट दिली. या भेटीदरम्यान मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी बुलेट ट्रेनचा मुद्दा उपस्थित केला.
मुंबई-अहमदाबाद दरम्यान एलिवेटेड मार्गाने बुलेट ट्रेन चालवणे शक्य होईल का, असा प्रश्न रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी विचारला. तसेच या गाडीचे सुरुवातीचे व शेवटचे काही अंतर भुयारी ठेवून २५ किमीच्या टप्प्यात ही गाडी भुयारी मार्गाने चालवणे शक्य होऊ शकते. असे मत लू डाँग फू यांनी व्यक्त केले. मुंबई एलिवेटेड मार्ग उभारणे अडचणीचे असल्याचे या वेळी सूद यांनी चीन शिष्टमंडळाला सांगितले.