वर्सोवा ते घाटकोपर या पहिल्या टप्प्यातील मेट्रो रविवारी प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.
मुंबई – वर्सोवा ते घाटकोपर या पहिल्या टप्प्यातील मेट्रो रविवारी प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. रविवार सुट्टीचा दिवस हेरून मेट्रोची सफर करण्यासाठी मुंबईकरांची तुडूंब गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने मेट्रो रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
अशी असेल मेट्रो
मेट्रोच्या मार्गावर एकूण १२ स्थानके आहेत. वर्सोवा ते घाटकोपपर्यंत फक्त २१ मिनिटांत पोहोचता येणार आहे. रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व डब्यांत अद्ययावत व्हिडिओ ट्रान्समिशन यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे डब्यातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होईल. देशातील चार मेट्रो सेवांपैकी केवळ मुंबई मेट्रोमध्येच ही यंत्रणा उपलब्ध आहे.
मेट्रोच्या डब्यात लावलेल्या कॅमेराद्वारे डब्यातील संशयास्पद हालचालींवर मध्यवर्ती नियंत्रण कक्षामार्फत करडी नजर ठेवली जाणार आहे. सर्व स्थानकात सीसीटिव्हीचे कॅमेरांचे जाळे असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना निर्धास्त प्रवास करता येईल, गाडी सुरू असताना डब्यातील हालचालींवर कॅमेराची बारीक नजर असेल. प्रत्येक स्थानकावर श्वान पथक आणि हॅड डिटेक्टर उपलब्ध असतील. अनुभवी श्वान पथकाकडून गस्त घालण्यात येईल. प्रवाशांच्या सामान तापासणीसाठी एक्सरे स्कॅनर असणार आहेत. स्थानक परिसरात मुबलक प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात असतील. कॅमेराने पायलटच्या केबिनमधील रेडिओसेट यांच्यात फायबर ऑप्टिक्स केबलद्वारे संपर्क ठेवला जाईल. तसेच दहशतवादी कारवायांबाबत सर्तक राहण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार असल्याचे मेट्रो रेल्वे-१ प्रकल्पाच्या अधिका-यांनी सांगितले.
सध्या मेट्रोच्या ताफ्यात १६ गाडय़ा उपलब्ध असून अंधेरी डीएननगर येथे ९.७५ हेक्टर जागेत कार डेपो उभ्या करण्याची क्षमता आहे. त्याशिवाय एक नियंत्रण कक्ष, व्हर्चुअल प्रक्षिशण केंद्र, विद्युत केंद्र, व्यवस्थापकीय कार्यालय अशी व्यवस्था आहे. तसेच वाहतूक नियंत्रण, चोख देखरेख, सिग्नल आणि दळणवळण व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.