भारताची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिम फत्ते झाल्याबद्दल बॉलीवूड कलाकारांनीही इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.
मुंबई – संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली भारताची मंगळ मोहिम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्याने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ३०० दिवसांचा प्रवास करुन भारताच्या मंगळयानाने बुधवारी यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. यासाठी संपूर्ण भारतातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिम फत्ते झाल्याबद्दल बॉलीवूड कलाकारांनीही इस्त्रोचे अभिनंदन केले आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि श्रीदेवी यांसारख्या बड्या कलाकारांनी इस्त्रोच्या या यशस्वी मोहिमेबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
मंगलयान… भारत माता की जय! ऐतिहासिक! पहिल्या प्रयत्नात यशस्वी ठरलेला एकमेव देश, हॉलीवूड चित्रपटांपेक्षाही कमी खर्चात आपल्या शास्त्रज्ञांनी हे साध्य केले जे अद्याप कोणी करु शकलेले नाही. बधाई, प्यार, स्नेह, अभिनंदन आणि जयजयकार! Mom या शब्दात ट्विटरद्वारे बिग बींनी अभिनंदन केले.
तर भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही नमस्कार, सगळ्या देशवासीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आपल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी चमत्कार घडविला असे म्हटले आहे. तसेच अक्षय कुमार, श्रीदेवी, शाहिद कपूर, अभिषेक कपूर, सुनिधि चौहान यांनीही ट्विटरद्वारे इस्त्रोचे अभिनंदन केले.
सकाळी एका चांगल्या बातमीने दिवसाची सुरुवात झाली. किती महान ध्येय साध्य केलं आहे. अभिनंदन इस्त्रो #ProudIndian – अक्षय कुमार
या यशस्वी मोहिमेसाठी मी भारत आणि इस्त्रोचे अभिनंदन करते. Mangalyaan #MissionMars #MarsMission,” – श्रीदेवी
मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचले. अभिमानास्पद बाब. #proudindian – शाहिद कपूर