गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूचा सर्वाधिक धोका असताना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या स्वतंत्र कक्षाला जोडूनच गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी विभाग चालविण्यात येत आहे.
मुंबई – गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूचा सर्वाधिक धोका असताना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या स्वतंत्र कक्षाला जोडूनच गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी विभाग चालविण्यात येत आहे. रोज मोठय़ा संख्येने गर्भवती महिला सोनोग्राफी करण्यासाठी येथे येतात. त्यावेळी या ठिकाणी महिलांनी तुंडुब गर्दी झालेली असते. स्वाईन फ्लूचे रुग्ण हाकेच्या अंतरावर असल्याने या महिलांना स्वाईन फ्लूच्या विषाणूंची लागण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, रुग्णालयात प्रशासन अक्षरश: दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
स्वाईन फ्लूच्या विषाणूंची लागण गर्भवती महिलांना पटकन होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी राहत असल्याने या आजाराला ते लगेचच बळी पडतात. त्यामुळे अशा महिलांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, वेदना, सर्दी, शरीराच्या तापमानात बदल अशी प्रमुख लक्षणे आढळून येतात. मागील वर्षी दहा गर्भवतींचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
विशेषत: स्वाईन फ्लू हा आजार संसर्गजन्य असल्याने अन्य रुग्णांना याची लागण होऊ नये, म्हणून स्वाईन फ्लू रुग्णांसाठी असलेला विभाग काही अंतरावर असावा, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. परंतु, राजावाडी रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार सुरू असून या विभागाला लागूनच गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी विभाग आहे.
या कारणास्तव गर्भवतींना आणि गर्भातील बाळाला स्वाईन फ्लू होण्याची शक्यता अधिक आहे, अशी भीती रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही विभागांपैकी एक विभाग अन्यत्र हलविण्याबाबत कोणता निर्णय घेणार याबाबत विचारण्यासाठी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांना संपर्क केला असता त्यांना भेटण्यास नकार दिला.
पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू आहे. परंतु, या विभागांमध्ये अनेक स्वाईन फ्लूचे रुग्ण नसतात. केवळ संशयित रुग्ण आढळून आल्याने उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात येते. मात्र, स्वाईन फ्लू विभागापासून अन्य वॉर्ड काही अंतरावर असणे गरजेचे आहे. जेणेकरून या विषाणूंचा अन्य रुग्णांना प्रादुर्भाव होऊ नये. पण, राजावाडी रुग्णालयात असे घडत असल्यास मी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांच्याशी याबाबत चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन.
– डॉ. पद्मजा केसकर, पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी