आपल्या मराठी चित्रपटांच्या वेगळेपणाची वाखाणणी मला भाषेतील चित्रपटकर्मीकडून ऐकायला मिळणे हा विलक्षण उभारी देणारा अनुभव असतो.
मुंबई- आपल्या मराठी चित्रपटांच्या वेगळेपणाची वाखाणणी मला भाषेतील चित्रपटकर्मीकडून ऐकायला मिळणे हा विलक्षण उभारी देणारा अनुभव असतो. वेगळ्या आणि उत्तम मराठी चित्रपटांना पाठबळ देणा-या अभिरुची संपन्न मराठी प्रेक्षकांमुळेच ही वेगळी निर्मिती मराठीत शक्य झाली आहे. यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत सातत्याने मराठी चित्रपट झळकत आहेत.
‘शटर’ हा आमचा सिनेमाही असाच वेगळा आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले. ‘शटर’च्या पूर्वप्रसिद्धीसाठी शुक्रवारी ‘प्रहार’ कार्यालयात आलेल्या खेडेकर यांनी ‘प्रहार’च्या कर्मचा-यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, निर्माता प्रकाश बेळे, दिग्दर्शक जे. के. प्रकाश उपस्थित होते.
आजवरच्या प्रवासात वैविध्यपूर्ण भूमिका आणि जवळपास शंभरेक चित्रपट केल्यानंतर आता आणखी एक चित्रपट करायचा एवढयाच मर्यादित भावनेतून मी नव्या चित्रपटाच्या प्रस्तावाकडे बघत नाही. तर, प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांची अभिरुची अधिकाधिक समृद्ध कशी होईल, माझ्या भूमिकेच्या माध्यमातून चांगल्या व वेगळया पद्धतीचे कथानक कसे मांडता येईल, हा विचार आता सुरू असतो, असेही ते म्हणाले.
सोनालीनेही शटरमध्ये फारच चांगली भूमिका केली असून आतापर्यंत ज्या पद्धतीच्या तिच्या भूमिका प्रेक्षकांनी पाहिल्या असतील त्यापेक्षा वेगळया पद्धतीची भूमिका तिने साकारली आहे. तिचा ही भूमिका करताना अगदी कस लागलेला आहे, असे सांगत त्यांनी सोनालीचेही जाहीर कौतुक केले. चित्रपटाचे निर्माते प्रकाश बेळे यांनी या निर्मितीमागची त्यांची भूमिका स्पष्ट केली.
गेल्या काही वर्षामध्ये प्रादेशिक चित्रपट हे फार चांगल्या प्रकारचे कार्य करत असून खासकरून मराठी भाषेतल्या चित्रपटांनी फारच चांगली उंची गाठली असल्याचंही ते म्हणाले. हा चित्रपट आम्ही आधी मल्याळम केला होता. चोखंदळ मराठी प्रेक्षकांमुळे त्यानंतर तो मराठीतच करावा, असे वाटले, असे त्यांनी सांगितले. ही भूमिका माझ्यासाठी फारच वेगळी होती. ही भूमिका जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा एखाद्या उपाशी माणसाला जेवणाचं ताट पाहून काय वाटेल, अशी माझी अवस्था झाली होती.
सर्वच कलाकारांना अशा प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा असते. या सिनेमाने मला फार काही शिकवले आहे, असे सोनाली यांनी सांगितले. या चित्रपटाची मांडणी करताना त्यात वेगळेपणा असेल. मराठी प्रेक्षकांना एक नवा अनुभव मिळायला हवा असा विचार केल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक जे. के. प्रकाश यांनी यावेळी सांगितले. मराठी कलाकारांविषयी माझ्या मनात फारच आदर आहे. विश्वास आहे. या चित्रपटातल्या प्रत्येक कलाकाराने तो सार्थ ठरवल्याचेही ते म्हणाले.
हा चित्रपट आपल्या जाणिवांची खोली तपासणारा आहे. कोणत्याक्षणी कोणता माणूस कसा वागतो हे दाखवणारा आहे. आपण अनेकदा सगळयांबद्दल मनात एक धारणा, पूर्वग्रह बाळगून असतो. प्रत्यक्षात एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काय होते हे मात्र या चित्रपटातून कळणार आहे.
या चित्रपटाची कथा जरी आता सांगता येणार नसली तरी हा चित्रपट प्रेक्षकांनी नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहावा व हा अनुभव नक्की घ्यावा, असे आवाहनही यावेळी सचिन खेडेकर यांनी केले. ‘प्रहार’चे संपादक मधुकर भावे यांनी यावेळी सर्व कलाकारांचे स्वागत केले. चांगल्या व आशयघन चित्रपटांच्या मागे आम्ही नक्कीच उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
(‘शटर’ चित्रपटाविषयी विशेष लेख प्रसन्न पुरवणीत)