शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असतानाही काही शाळांच्या परिसरात अजूनही सर्रासपणे तंबाखू, सिगरेट, गुटख्याची विक्री केली जात आहे.
मुंबई – शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास बंदी असतानाही काही शाळांच्या परिसरात अजूनही सर्रासपणे तंबाखू, सिगरेट, गुटख्याची विक्री केली जात आहे. मुंबई महापालिकेने या पदार्थाची विक्री करणा-यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, ७६ दुकानदारांविरोधात खटले दाखल केले.
महापालिकेने विविध शाळांच्या परिसरातील सुमारे २९९ पानपट्टींची तपासणी करून १७० दुकानदारांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. मात्र फेरतपासणीतही ७६ दुकानदार दोषी आढळले. त्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेनेही ७ एप्रिल रोजी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असल्याचे परिपत्रक काढून या नियमाचे पालन होत नसल्याचे संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले. या परिपत्रकानुसार कारवाई होत आहे की नाही हे पाहण्यासाठी ‘सलाम मुंबई फाउंडेशन’ने मे महिन्यात २०० शैक्षणिक संस्थांच्या परिसराचे सर्वेक्षण केले.
त्यात १२२ शाळांच्या परिसरातील ३०७ दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. तंबाखूचे घातक परिणाम दाखवणारे फलक कोणत्याही शाळेने लावले नसल्याचेही या पाहणीत आढळून आले. फाउंडेशनच्या या अहवालाची पालिकेला आठवण करून देतानाच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी केली होती.
‘शारदा’ला वेगळा न्याय का?
शाळांच्या १०० मीटर परिसरामध्ये एकही सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्रीचे पानबिडीचे दुकान नसावे, यासाठी मनसे आटापिटा करत असताना शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्यामंदिरसमोरील ‘शारदा पान शॉप’ला मात्र मनसेचा वरदहस्त मिळत असल्याचे समोर आले आहे.
‘शारदा’मध्ये राजरोसपणे सिगारेटच्या पाकिटांची विक्री केली जाते. मात्र, केवळ साहेबांना सिगारेटची पाकिटे पाठवली जातात, याचसाठी या दुकानाला अभय असल्याची चर्चा आहे. आजही शारदामध्ये बंदिस्त सिगारेटची पाकिटे खुलेआमपणे विकली जात आहेत. या पान दुकानाविरोधात पालकांच्या तक्रारी आल्याने काही महिन्यांपूर्वीच युवासेनेने दुकानाविरोधात आंदोलनही केले होते. त्यावेळी, मनसेने मात्र शारदा पान शॉपची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली होती.