केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणानंतर स्टेट बँक आणि इतर बँका गृह आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात जानेवारीपासून कपात करण्याची शक्यता असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबई- केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणानंतर स्टेट बँक आणि इतर बँका गृह आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात जानेवारीपासून कपात करण्याची शक्यता असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नोटांच्या कमतरतेमुळे सध्या नागरिक चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याचे टाळत आहेत. याच परिस्थितीत व्याजदरात होणारी कपात ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकणार आहे.
नोटाबंदीनंतर बँकांमध्ये मोठया प्रमाणात जुन्या नोटा जमा झाल्यानंतर गृह आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा विविध स्तरातून व्यक्त करण्यात येत होती. व्याजदरातील कपातीबाबत मात्र स्टेट बँकेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी संपत असली तरीही पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध त्यानंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर व्याजदर कपातीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे बँक संघटनांच्या झालेल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आले. वर्षभरासाठी हा व्याजदर ८.९० टक्क्यांवर राहण्याची आशा या वेळी स्टेट बँकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या देशभरातील जवळजवळ सर्वच बँका बचत खात्यावर ४ टक्के व्याज देत आहेत. मात्र नोटाबंदीनंतर बचत खात्यावरील व्याजदरातही कपात होण्याची शक्यता आहे. निश्चलनीकरणानंतर अनेकांनी आपल्या कर्जाची रक्कम फेडली असून अनेकांनी कर्जापासून दूर राहणे पसंत केले आहे. बँकांकडे कर्जाची मागणी करणा-यांच्या संख्येत घट झाली असली तरी नोटाबंदीनंतर बँकांकडे मोठया प्रमाणात रोकड जमा झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत १ एप्रिल ते ९ डिसेंबरदरम्यान बँकांच्या क्रेडिटमध्ये वाढ होऊन ती ७३ लाख कोटी झाली आहे. तर बँकांच्या ठेवींमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होऊन ती १०५.९ लाख कोटी झाली आहे, असे बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.